कोकण मराठी साहित्य परिषदेचे आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन.! ; ज्येष्ठ लेखिका उषा परब यांचा ‘स्वानुभव’ दमदार लेखनीतून।

39
नमस्कार..!
साधारण ३२ वर्षापूर्वी मधू मंगेश कर्णिक यांनी आपल्या कांही शिलेदारांना सोबत घेऊन कोकण मराठी साहित्य परिषदेचं रोप लावलं. कार्यकर्त्यांचा उदंड उत्साह, मेहनत आणि मधूभार्इंच डोळस मार्गदर्शन याने ते पाना पानातून फांदीफांदीतून विस्तारत गेलं. आज या संस्थेचे कार्य कोकणातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात एक कृतीशिल साहित्य चळवळ म्हणून लोकमान्य ठरत आहे.
मराठी भाषेचे रोपण-संवर्धन-प्रचार आणि प्रसार यांच्याशी बांधिलकी राखणारी ही संस्था आता कोकणापुरती मर्यादित राहिली नाही तर तिने महाराष्ट्राबाहेरही गोवा, कर्नाटक, राज्यात तेथील मराठी प्रेमीच्या सहकार्याने साहित्य संमेलने यशस्वी केली आहेत. लिहित्या अनेक हातांना कोकण मराठी साहित्य परिषदेने उर्जा दिली. मातृभाषेबद्दल अभिमान बाळगणारी मने निर्माण केली. आणि आतातर देशातील-देशाबाहेरील मराठी साहित्यप्रेमी मनांना जोडणारा निखळ सेतू म्हणूनही कोकण मराठी साहित्य परिषदेने एक आशावाद निर्माण केला आहे. मॉरीशसमध्ये होणारं दोन दिवसांचं मराठी साहित्य संमेलन ही याचीच नांदी म्हणावीशी वाटते.
   
यापूर्वी सिंगापूरमध्ये कोकण मराठी परिषदेने तेथील महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने आणि सहभागाने साहित्यिक कार्यक्रम घडवून आणला होता. पण मॉरिशयमध्ये होणारे दोन दिवसांचे साहित्य संमेलन हे आम्हां संस्थेच्या कार्यकत्यांसाठी विशेष होते. ते घडवून आणण्यासाठी परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांने हितचिंकांनी खूप मेहनत घेतली आहे.
मॉरिशसमध्ये पन्नास टक्केहून अधिक आबादी हिंदुंची आहे. पण तरीही मराठी भाषेचा नंबर मात्र इथे चवथ्या क्रमांकावर घसरतो. त्यामुळे मराठी भाषेशी व्यवहारीक नातं नसलं तरी मराठी भाषा आमच्या पूर्वजांची मातृभाषा आहे, हे भावनीक नातं इथल्या हिंदुच्या मनात आजही कायम आहे. त्यामुळे मराठी सण-उत्सव जपण्याचा इथे नितांत प्रयत्न होतो.
आपल्या पूर्वजांच्या मराठी भाषेचं इथे संवर्धन व्हावं प्रसार व्हावा असंही अनेक तरूणांना वाटतं. त्यासाठी त्यांचे प्रयास सुरू आहेत. म्हणूनच इथली कांही मराठी मंडळं, संस्था याने कोकण मराठी साहित्य परिषदेला साद दिली. परिषदेनेही हात पुढे केला. आणि 2 व 3 डिसेंबरला मॉरिशस सरकार, महाराष्ट्र सरकार, मराठी कल्चरल सेंटर, मॉरीशस स्पिकींग सेंटर यांच्या सहकार्याने व सहभागाने हे संमेलन यशस्वी झालं.
तो केवळ मराठी चा उत्सव नव्हता. प्रचार प्रसारही नव्हता तर मराठीबध्द्दल आस्था बाळगणा•या मराठी प्रेमीमधील जिव्हाळ्याचा सुसंवाद होता. ह्या हृदयीचं त्या हृदयी पोचवण्याची तळमळ होती. आपण सारे मिळून कांही करू शकतो हा विश्वास होता. तिथे एकत्वाची व समविचारांची एक अनोखी भावना संमेलनाला उपस्थित असणा•या माझ्यासारख्या प्रत्येकालाच जाणवली.
आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन कसं असेल? हे कुतुहल घेऊन आम्ही संमेलन स्थळी पोचलो तेव्हा सभागृह अगदी शांत होतं. कसलाही गोंधळ नाही की गडबड नाही. व्यासपीठावर एक मोठा डिजीटल बोर्ड आणि व्यासपिठाच्या एका बाजूला भारताचा तिरंगा आणि दुस•या बाजूला मॉरीशचचा झेंडा फडकत होता.
ग्यानबातुकारामाच्या गजरात ग्रंथदिंडी संमेलनस्थळी पोचली तेव्हा ग्रंथदिंडीच्या वारक•यात मोरीशसची मंडळीही टोपी सदरा घालून व बायका नववारी नेसुन सहभागी होत्या. सुरवात दोन्ही देशांच्या राष्ट्रगिताने झाली. तेव्हा नकळत एक भारलेपण सभागृहाला व्यापून राहिलं. जाणवू लागलं हेच ते आंतरराष्ट्रिय साहित्य संमेलन. देशादेशाच्या सीमा मनातून फुसल्या गेल्यात. राहिलं ते मराठी भाषा, साहित्य आणि साहित्यप्रेम एकजात.
जेष्ठ लेखक, संपादक, पत्रकार मा. विजय कुवळेकर यांच्या अध्यक्षपदाखाली सुरू झालेल्या या संमेलनातून दोन्ही देशांच्या निमंत्रित सर्वच विचारवंताने आपापल्या मनोगतातून फार गांभिर्याने मराठीच आजचं वास्तव व त्या संदर्भात साधक बाधक विचार व्यक्त केले. आशावाद मांडला. विशेषत: मॉरिशसमधील भाषासंर्वधनासाठी प्रयत्न करणा•या तरूणाने आपले प्रयत्न, येणा•या मर्यादा आणि अपेक्षित सहकार्य या संदर्भात तळमळीने आपले मनोगत व्यक्त केले.
या दोन दिवसांत झालेल्या परिसंवादातून एक उत्तम वाड:मयीन अभिसारण झालं असं  म्हणता येईल. अर्थात या परिसंवादात मॉरिशस व महाराष्ट्र दोन्हीकडचे वक्ते सहभागी होते. डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, वृषाली मगदूम, उषा परब, निशी हिरू, रेणू दांडेकर, नमीता कीर, अंजु रामगोपाळ, जयू भाटकर, वगैरे ने त्या त्या विषयाला अनुसरून आपले विचार आपापल्या अनुभव परिक्षण-निरीक्षणातून व्यक्त केले. अनेक मुद्द्यांचा या परिसंवादातून उवापोह झाला असं म्हणता येईल. मराठीची सद्यःस्थिती तिला मिळणारा अपुरा राजाश्रय मराठी भाषिकांची अनास्था, मराठी समोरील आव्हांनं-उपाय, वाचन संस्कृती तिची बदलती स्वरूपं मराठीच्या बोलीभाषा त्यांचा होणारा संकोच, मराठी भाषेचं भवितव्य जागतीकरणाच्या रेट्यात मराठीच्या संवर्धनाचं आव्हान त्यासाठीच्या उपाययोजना यासारख्या अनेक मुद्द्यांवर मौलीक व अनुभवानिष्ठ विचार मांडले गेलेत.
मुख्य म्हणजे ग्लोबल जगात वावरणा•या आजच्या तरूण पिढीला आपल्या मराठीबद्ध्दल काय वाटतं? त्यांची भुमिका काय ? आक्षेप कोणते ? अपेक्षा कोणत्या ? आपल्या मातृभाषेच्या जतनी करणासाठी त्यांचा दृष्टीकोन काय आहे त्याच्या समोरील रोडमॅप काय आहे? या संदर्भातही त्यांना  बोलण्याची संधी दिली गेली. तरूणाने या संदर्भात लक्षवेधी मुद्दे मांडलेत.
कवी अशोक नायगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनामध्ये दोन्ही देशाच्या कविने विविध आशय विषयांच्या कविता सादर करून रंग भरला.
एकूणच हे संमेलन अनेक अर्थाने मराठीचा जागर ठरला. तुझ्या देशा माझ्या देशा या पलिकडे जाऊन ‘आम्ही सारे मराठी भाषीक’ ही एकच भावना ठळक होत गेली. या भावनेच्या पोटीच तर मॉरीशसमध्ये कोकण मराठी परिषदेच्यावतीने मराठी पुस्तक ग्रंथालय सुरू केलं गेलं. संमेलनाला जाताना शे पाचशे पुस्तंकं सगळ्याने या ग्रंथालयासाठी भेट दिली आणि यापुढेही वर्षातून दोन वेळा ग्रंथालयासाठी उपयुक्त पुस्तकं पाठवण्याची ग्वाही परिषदेने दिली आहे. कांहींने उत्सुफुर्तपणे वैयक्तिकरित्याही ही जबाबदारी स्विकारली. कोकण मराठी साहित्य परिषदेचं हजारो मराठी पुस्तकांचं एक अद्यावत उत्तम ग्रथांलय मॉरिशच्या मराठी वाचकासाठी तेथे उपलब्ध असावं यासाठी नजीकच्या काळात अधिक प्रयत्न करण्याचा मानस परिषदेचे प्रमुख विश्वस्त श्री. रमेश कीर यांनी व्यक्त केली. आणि ते होईलच याचा रास्त विश्वास वाटतो.
मॉरिशसमधली लेखकांची मराठी पुस्तकं प्रकाशित करून देण्याची जबाबदारीही को.म.साने स्वत:हून स्विकारली. साहित्य सेवेची ही देवाण घेवाण दोन्ही देशातील मराठी प्रेमीमध्ये सातत्याने सुरू  राहिल असा एक अनौपचारिक अदृश्य करारच झाला आहे आमुच्यात अस वाटू लागल आहे.
वैचारिक बौध्दिक मंथनाबरोबरच या संमेलनामध्ये कांही लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर्शन घडविले गेले. मॉरिशसमध्ये मराठी भाषा बोलणारी माणसं कमी असली तरी मराठी संस्कृती जपणारी अधिक आहेत. मुळात या देशात निम्म्याहून अधिक नागरीक हिंदू आहेत. सहाजिकच पूर्वजांच्या हिंदू संस्कृतीबध्दल त्यांना आस्था व आत्मियता आहे. इथे हिंदू देवदेवतांच्या मुर्ती, मंदिरे आहेत ज्यांची ते पूजा करतात. हिंदू सण, गणपती उत्सव, शिवरात्र, मंगळागौर, यासारखे बरेच मराठी सण इथे उत्साहाने साजरे होतात. आणि म्हणून इथल्या मराठी बांधवांसाठी कांही लोककला या संमेलनातून आवर्जुन सादर केल्या गेल्यात. कोळीनृत्य, बालनृत्य, मुरगुंडा, पोवाडा, गवळण, मंगळागौर, यांची धावती झलक सादर झाली. मर्द मावळ्यांचा शिवाजी जितका महाराष्ट्रात वंदनीय आहे तितकाच मॉरिशसमध्येही. त्यामुळे इथे स्वराज्यनीष्ठ या ऐतिहासिक नाटकातील शिवाजी संभाजीच्या पराक्रमावर प्रकाश टाकणारे कांही प्रवेश डॉ. ढवळ आणि त्यांच्या सहकारी कलाकारांनी सादर केलेत. ते पहाताना सभागृहीतील सारेच रसिक भरावून गेले होते.
मॉरिशसच्या आगळ्या वेगळ्या लोककलेचाही आम्हांला तिथे आस्वाद घेता आला. त्यांच्या धाकोर्डा या नृत्य प्रकाराने डोळ्यांचे पारणे फिटले. संमेलनाच्या समारोपा दरम्यान सभागृहात समान वेशभुषा असलेल्या दहा पंधरा तरूणाने प्रवेश केला. आणि ते आलेत, ते नाचले, ते जिंकलेची अनुभुती आली. मॉरिशसमध्ये गणपती उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. तेव्हा डफली, झांजा, लेझीम या वाद्य संगिताच्या ठेक्यावर हे नृत्य केलं जातं. गीतातील शब्दांचे बोल आपल्या गणपतीच्या आरतीचेच होते. पण त्यांची चाल, ढाल खुपच वेगळी. ही मुलं इतकी बेफान नाचली की पंधरा मिनिटे त्यांनी आमच्या नजरा आणि मनं स्वत:पाशी खिळवून ठेवली. त्याचं संगित त्यांचा ताल ठेका, त्यांचा उत्साह, ऊर्जा, आवेश आणि देवाप्रती भक्तीभाव सारच लक्षवेधी होतं. साहित्य आणि संस्कृती नाण्याच्या दोन बाजू असतात असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती या संमेलनातून भरभरून आली.
अजूनही हे संमेलन अप्रत्यक्षरीत्या आपल्याला कांही सुचवू पहातय असं सारखं वाटत आहे मला. संमेलन यशस्वीतेसाठी जेवणावळी, हारतुरे, सजावट, मानपान, बॅनरबाजी या सा•यांची आवश्यकता असतेच असं नाही. साधेपणाने सुनियोजित पध्दतीने वेळ आणि खर्चाचा ताळमेळ साधत संमेलन यशस्वी करता येतं. नियोजित वेळेत प्रत्येक कार्यक्रम कसा पूर्ण करता येतो याचा वस्तूपाठच मिळाला या संमेलनातून.
संमेलनाच्या निमित्ताने थोडंफार मॉरिशस दर्शन ही घडलं. इथला स्वच्छ सुंदर समुद्र किनारा, इथले तलाव. वर निळे आकाश खाली हिरवी धरती. या हिरवाईच्या नीळाईच्या छटा तरी किती मोहक! उगाच नाही मॉरिशसला पाचूचे बेट म्हणत. थेट तिथल्या मातीत फिरू न त्याचा प्रत्यय घेण्याची सुंदर भेट या संमेलनाने दिली.
हे संमेलन तिथली मनमिळावू मराठी माणसं, त्यांच्याशी घडलेला साहित्यसंवाद आणि सहवास, तिथला देखणा निसर्ग बराच काळ काळजात वस्तीला राहिल एवढं नक्की…..
लेखिका – उषा परब (सावंतवाडी)
(फो.नं. 9423818828)