नवी दिल्ली : ‘मी मोदी आहे, मला मोदीजी म्हणून संबोधू नका! असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना काढले. विधानसभा निवडणुकांत भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत मोदी यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. निवडणुकांतील कामगिरीवर यावेळी चर्चा करण्यात आली.
‘लोकं मला मोदी या नावाने ओळखतात. त्यामुळे आदरणीय मोदीजी म्हणत मला जनतेपासून दूर करू नका. ही मोदींची गॅरंटी आहे, असे जनता म्हणते. त्यामुळे आपण नेत्यांनी देखील ‘मोदी’ असाच माझा उल्लेख करावा,’ असे पंतप्रधान म्हणाले. भाजप नेत्यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती प्रभावीपणे आपापल्या मतदारसंघात जाऊन द्यावी, असे सांगत मोदी म्हणाले की, सामूहिक मेहनत केल्यामुळे पक्षाला तीन राज्यांत यश मिळालेले आहे.
हा एकट्या मोदींचा विजय नाही तर कार्यकर्त्यांचाही विजय आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम केले आहे. पण आता पुढील वाटचालीचा विचार केला पाहिजे. खासदारांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग घ्यावा. कारण वर्ष २०४७ पर्यंत देशाला विकसित बनवायचे आहे. राज्यांतील निवडणुकांनंतर भाजपचे सरकार पुन्हा येण्याचे प्रमाण ५८ टक्के इतके आहे तर काँग्रेसचे पुन्हा सत्तेत येण्याचे प्रमाण केवळ १८ टक्के इतके आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी बैठकीत दिली. या बैठकीसाठी मोदी यांचे आगमन होताना खासदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.





