शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.! ; काय होणार निर्णय?

38

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज बैठक होणार आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षण संघर्ष, अवकाळी पाऊस, असे अनेक प्रश्न राज्यात निर्माण झाले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिनांक १७ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचे कार्यवृत्त कायम करण्याबाबत आज निर्णय होऊ शकतो. जुलै-२०२३ ते सप्टेंबर-२०२३ या महिन्यांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीची स्थितीचा आढावा घेण्यात येणार.

राज्यातील पीक,पाणी परिस्थितीचा आढावा, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे राज्यातील ९९ हजार हेक्टर वरील फळबागांना फटका बसला आहे. भाजीपाला, ऊस, कापूस, कांदा, द्राक्ष आणि अन्य पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यात येणार.

राज्य सरकार पुढील आठवडाभरात नुकसानग्रस्त १६-१७ जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण करून हिवाळी अधिवेशनात मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. केंद्राच्या निकषांपेक्षा वाढीव मदत देण्यावर राज्य सरकारकडे प्रस्ताव विचाराधीन आहे. जास्त नुकसान झालेल्या फळबागांसाठी अतिरिक्त मदतीची रक्कम थेट खात्यावर जमा केली जाणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गतच्या पुनर्वसन सदनिका विहित मुदतीनंतर हस्तांतरण करताना आकारायच्या हस्तांतरण शुल्कात कपात करण्याबाबत देखील आज निर्णय होऊ शकतो.

तसेच मराठी भाषा भवन, महाराष्ट्र, मुंबई या इमारतीच्या सुधारीत आराखड्याचे सादरीकरण करण्याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूमिकेवर कामगिरी लेखापरीक्षण अहवाल मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाऊ शकतो.