आव्हाड आणि वेदना…न बोललेलं बरं.! ; अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांना टोला.

44

मुंबई- शरद पवार आणि अजित पवार गट यांच्यामध्ये निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. पक्ष आणि चिन्ह आपलाच आहे असं म्हणत दोन्ही गटाकडून युक्तीवाद केला जात आहे. अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर करण्यात आलेल्या युक्तीवादामुळे शरद पवार गट नाराज झाला आहे. त्यामुळेच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन यामुळे वेदना होत असल्याचं वक्तव्य केलं. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, हे एकूण डोळ्यात पाणी आलं. ज्यांनी झाड लावलं मोठं केलं त्यांनाच हे आज भोगावं लागतंय, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं.वेदना आणि आव्हाड कधी जुळतं का? मी न बोललेलं बरं, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार गट बाहेर पडला आहे. आता या गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा सांगण्यात आला असून यासाठी निवडणूक आयोगासमोर लढाई सुरु आहे. ६ ऑक्टोंबर रोजी झालेल्या सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. अजित पवार गटाने आमच्याकडे सर्वाधिक ४१ आमदार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पक्ष आमचाच असल्याचं ते म्हणाले होते.

पुढील सुनावणी ९ तारखेला होणार आहे. या दिवशीही जोरदार युक्तीवाद होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक हे देखील अजित पवार गटात सामिल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं. दरम्यान, ज्यांच्यासाठी पवारांनी केलं तेच आता त्यांना घराबाहेर काढत आहे. सुनावणी दरम्यानच्या हुकुमशाह या युक्तीवादाने दु:ख झालं, असं रोहित पवार म्हणाले.