पवार, ठाकरेंनी इंडिया आघाडी सोडावी.! ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला.

38

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना इंडिया आघाडी सोडण्याचा सल्ला दिला. इंडिया आघाडी सोडायची नसेल तर हिंदू धर्म व संस्कृतीविषयी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी यांनी केलेले वक्तव्य मान्य असल्याचे तरी जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले.

भाजपच्या लोकसभा महाविजय अभियानासाठी ते नाशिकमध्ये आले असताना माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

ते म्हणाले, की तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांचे पुत्र उदयनिधी यांनी तमिळनाडूमध्ये हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीविषयी केलेल्या वक्तव्याला शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे समर्थन असावे. मान्य नसेल तर त्या वक्तव्याचा निषेध करीत इंडिया आघाडी सोडावी. सत्तेच्या लालसेपोटी हिंदू धर्म व संस्कृती संपविण्याची भाषा करणाऱ्यांबरोबर ठाकरे व पवार मांडीला मांडी लावून बसत आहेत.

भाजपचा ४५ प्लसचा नारा –

लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा मिळविण्यासाठी महायुतीच्या आघाडीतील पक्षांशी बोलणे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कालखंडात तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मागील पाच वर्षांतील व शिंदे यांच्या सव्वा वर्षाच्या कार्यकाळातील लोकाभिमुख कामांची शिदोरी आम्ही जनतेसमोर घेऊन जात आहोत.

संघटनात्मक बांधणी करून लोकसभा निवडणुकीत ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. जागावाटपाचा निर्णय पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून होईल. जागावाटपाबाबत चर्चेतूनच तोडगा काढला जाईल.

खासदार श्रीकांत शिंदे भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवतील, या आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर त्यांना दिवसा स्वप्न दिसतात, असा टोला श्री. बावनकुळे यांनी लगावला. खासदार शिंदे हे प्रभावी आहेत, ते ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मते घेऊन पुन्हा निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला.

वक्तव्याचे राजकारण नको

पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला नोटीस बजावली आहे, तिला उत्तर देण्यास त्या सक्षम आहेत. अशा नोटिसा रद्दही होतात. पालकमंत्रीपदासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही.

पालकमंत्रिपद जाहीर करण्याबाबतचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. अजित पवार जे काही बोलतात, त्यांचे बोलणे हे नैसर्गिक आहे, त्यांच्या वक्तव्याचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

बावनकुळे यांची सारवासारव –

दरम्यान, नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बावनकुळे यांनी पत्रकारांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले, त्यावर आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सारवासारव केली. पत्रकार हे समाजातील सन्माननीय घटक आहेत.

चुकीची बातमी प्रसिद्ध होऊ नये, यासाठी त्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची बाजू योग्य रीतीने समजावून सांगावी. पत्रकार समाजाचे मत परिवर्तन घडवू शकतात, यासाठीच मी पत्रकारांना चहापानाला बोलविण्याचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला. त्यात काही गैर नाही, असेही समर्थन बावनकुळे यांनी केले.