कणकवली : कणकवली कॉलेजचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विज्ञान मंडळ आणि स्नेह सिंधु कृषी पदवीधर संघ, सिंधुदुर्ग रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, आत्मा सिंधुदुर्ग व उमेद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रानभाज्या महोत्सव २०२३’ कणकवली महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री साळुंखे, प्रमुख पाहुणे विशाल खत्री (IAS), महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, कृषी विभाग-आत्मा सिंधुदुर्गच्या श्रीमती भाग्यश्री नाईकन वरे, कृषी अधिकारी प्रशांत ओहोळ, स्नेह सिंधु कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष हेमंत सावंत, रोटरी क्लब कणकवलीचे अध्यक्ष रवी परब, सौ. मेघा गांगण उमेद सिंधुदुर्गचे जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार, प्रमुख वक्ते डॉ. निलेश कोदे व प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे हे विचार मंचावर उपस्थित होते.
प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी रानभाज्यांची ओळख करुन देताना, रानभाज्यांचा फोटो सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांच्या विविध जाती, प्रजातीची ओळख करून दिली. रानभाज्य पाककृतीच्या माध्यमातून समोर आलेल्या नवनवीन रानभाज्या व त्यांचे महत्त्व विशद करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ६४ प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत त्यांची नावे व आहारातील महत्त्व स्पष्ट करून सांगितले.
डॉ. निलेश कोदे यांनी रानभाज्या ठराविक काळामध्ये उपलब्ध होतात, त्यांचा आपल्या आहारात वापर केला पाहिजे. रानभाज्या शरीरातील घडणाऱ्या बदलावर गुणकारी असतात. निसर्गात आढळणाऱ्या रानभाज्यांवरती प्रक्रिया किंवा विविध संस्कार करून खाल्ल्या पाहिजेत आणि त्यांचा आहारात समावेश केला पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यानंतर
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आय. ए .एस. अधिकारी मा. विशाल खत्री यांनी रानभाज्या महोत्सवास शुभेच्छा दिल्या व स्पर्धकांसोबत संवाद साधून रानभाज्यांचा आस्वादही घेतला. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे, श्री हेमंत सावंत, श्री रवी परब यांनी या रानभाज्या महोत्सवास शुभेच्छा दिल्या. श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी रानभाज्यांचे महत्त्व विशद करून रानभाज्या आपल्या आहारामध्ये आल्या पाहिजेत असे प्रतिपादन केले व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यकमाच्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी रानभाज्या हा आपल्या आहारातील पूर्वजांनी दिलेला ठेवा आहे व त्याचा आपण आहारात वापर केला पाहिजे. निसर्गाने आपल्याला जे काही भरभरून दिलेले आहे त्याकडे आपण सकारात्मक रितीने पाहायला हवे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात रानभाज्यांचा वापर केला पाहिजे. निसर्गात आढळणाऱ्या विविध रानभाज्यांची माहिती घेऊन त्यांचा वापर निरोगी जीवन जगण्यासाठी केला पाहिजे असे मत व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील एकुण १३९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आजपर्यंत झालेल्या रानभाज्या पाककृती स्पर्धेतील हा उच्चांक होता. स्पर्धेच्या निकालामध्ये प्रथम क्रमांक सौ. स्नेहलता सुनील सावंत (वरवडे), द्वितीय क्रमांक सौ. दिपाली दिलीप सावंत (तरंदळे), तृतीय क्रमांक सौ. जयश्री बाळकृष्ण फोंडके (बीडवाडी) तर उत्तेजनार्थ सौ. जान्हवी गजानन काराणे (कुडाळ) व सौ.आर्या अनंत साटम (कणकवली) या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते साडी, प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
रानभाज्या पाककृती स्पर्धेचे परीक्षण मा. सौ. मंगलताई परूळेकर, सौ. प्रतिभा सावंत, सौ. अमृता पाडगावकर, प्रा. विनिता सावंत, प्रा. माधुरी राणे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेह सिंधूचे श्री. संदीप राणे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. सोमनाथ कदम यानी तर आभार प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ फोंडा चे प्रा. जगदीश राणे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास कणकवली शहरातील तसेच आसपासच्या विविध गावातील गृहिणी, मा. हेमंत सावंत, पंकज दळवी, डी. आर. परब, डाॅ. विद्याधर तायशेटे, सौ. मेघाताई गांगण व रोटरीचे इतर पदाधिकारी, श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे, श्री विनायक पाटील, आदी मान्यवर, महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ, स्नेहसिंधु पदवीधर संघ, रोटरी क्लब आँफ कणकवली सेंट्रल, आत्मा- सिंधुदुर्ग व उमेद-सिंधुदुर्ग या संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





