Home आरोग्य बापरे..! ठाण्यात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू ; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला!

बापरे..! ठाण्यात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू ; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला!

84

ठाणे : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यापूर्वी १० ऑगस्ट रोजी याच रुग्णालयात ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यानंतर यावरून बराच गदारोळ झाला. आता १७ रुग्णांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. कारण आठवडाभरात २२ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना धक्का बसला असून रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. प्राण गमावलेल्यांमध्ये १२ रुग्णांना आयसीयूमध्ये, तर २ रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये दाखल होते. याशिवाय, कॅज्युअल्टीमध्ये २ आणि बालरोगशास्त्रात १ रुग्ण दाखल होता.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ही घटना धक्कादायक आहे. डॉक्टरांची अपुरी संख्या, अपुरी सामुग्री आदी कारणांमुळे या घटना घडत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. याकडे  मुख्यमंत्री, ठाणे महापालिका आणि आरोग्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष देऊन सकारात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

१० ऑगस्ट रोजी ५ रुग्णांचा मृत्यू

यापूर्वी १० ऑगस्टच्या रात्री याच रुग्णालयात ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांची मोठी कमतरता असल्याने उपचाराअभावी या सर्वांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मृतांमध्ये एका ८० वर्षीय रुग्णाचाही समावेश होता. यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अधिकाऱ्यांना झापले होते.