मुंबई : समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहेत. अपघातांची मालिका कमी करण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत. मात्र, येथील अपघात कमी झालेले नाहीत. दरम्यान, आता सरकारने अपघात रोखण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांची अल्कोहोल टेस्ट केली जाणार आहे. वाढते अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांना दिली.
समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक पावले उचलली आहेत. गाड्यांमधील हवेचा दाब तपासण्यासाठी या ठिकाणी यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची अल्कोहोल टेस्ट केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली आहे. दादा भुसे यांनी शुक्रवारी समृद्धी महामार्गाचा आढावा घेतला, यावेळी जालन्यात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.





